आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की आपण मराठी मध्ये कसे काय ब्लॉग लिहावेत. आता मराठी मध्ये लिहीणे अत्यंत सोपे व सरळ झाले आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की लिहीणाचे तंत्र बहुसंख्य लोकांना माहितच नसतं.
मी या ब्लॉगद्वारे सर्व मराठी मित्रांना मराठीत लिहीणाचे तंत्र सांगणार आहे. सर्वात आधी आपण संगणकाची पार्श्वभूमी समजावून घेऊ म्हणजे आपल्याला पुर्वीच्या मराठी लेखनाचा आणि आत्ताच्या लेखनामधला फरक समजेन. मी फार तांत्रिक बाबीत जाणार नाहीये.
मित्रहो, पुर्वी संगणक विश्वात प्रामुख्याने इंग्रजी, रोमन इत्यादी भाषा लक्षात घेऊन संगणकाची निर्मीती करण्यात आली होती. देवनागरी लिपीचा त्यावेळी विचारच करण्यात आला नव्हता. त्यावेळी single byte वर आधारित प्रणाली विकसीत करण्यात आली होती जी इंग्रजी, रोमन इत्यादी भाषेच्या समावेशनासाठी पुरक होती पण देवनागरी लिपीच्या अक्षरांना समाविष्ठ होण्यासाठी पुरक नव्हती. दरम्यानच्या काळात संगणकाचा प्रसार भारतामध्ये मोठया प्रमाणावर झाला होता. देवनागरी लिपीमध्ये काम करण्यासाठी नविन तंत्राची आवश्यकता भासू लागल्यामुळे श्रीलिपी, आकती, आयएसएम अश्या ब-याच आज्ञावल्या बाजारात विकल्या जाऊ लागल्या. पण हया सर्व आज्ञावल्यामध्ये लिहीलेले पाहण्यासाठी त्याच आज्ञावल्यांच्या फॉंन्टची आवश्यकता लागायची. सदर लिहीलेले साहित्य हे संगणकीय भाषेमध्ये फक्त junk characters होती व तसा त्या साहित्याला संगणकीय भाषेमध्ये काहीच आधार नव्हता.
एकविसाव्या शतकात संगणक क्षेत्रात क्रांती घडून Double Byte वर आधारित प्रणाल्या विकसीत होऊन Unicode चा समावेश झाला व जगातल्या बहुसंख्य सर्वच लिपींचा संगणकीय प्रणाल्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता देवनागरी लिपीमध्ये लिहिण्यासाठी कोणत्याही स्वतंत्र आज्ञावलीची आवश्यकता नाही. पण Unicode मधील टाईप करण्यासाठी मुलत: Inscript Layout उपलब्ध असल्यामुळे व सर्वसामान्यपणे सगळीकडे Typewriter Layout चा वापर होत असल्यामुळे सुरुवाती अडचण निर्माण झाली होती. पण सदर अडचणीवर मात करण्यात आली असून आपल्या आवडेल त्या Layout द्वारे देवनागरी टाईप करण्याची सोय सद्या उपलब्ध झालेली आहे.
भारत सरकारच्या http://tdil.mit.gov.in/ तसेच http://www.cdac.in/ या संकेतस्थळावर भारतीय भाषेसाठी विविध उपयोगी आज्ञावल्या विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच जगातली सर्वात अग्रगण्य कंपनी मायक्रोसॉफट यांनी सुध्दा भारतीय भाषेसाठी एक प्रकल्प सुरु केला असून http://www.bhashaindia.com या संकेतस्थळावर भारतीय भाषेसाठी विविध आज्ञावल्या विमुल्य उपलब्ध करुन दिल्या आहेत.
Unicode मध्ये लिहिले साहित्य संगणकीय भाषेवर आधारित असल्यामुळे पाहण्यासाठी कोणत्याही विशेष आज्ञावलीची आवश्यकता नसुन तुम्ही आता मराठीमध्ये चक्क ई-मेल ही पाठवू शकता, चॅट करु शकता आणि खूप काही आपल्या मायमराठी मध्ये करु शकता.